Type Here to Get Search Results !

प्रकरणचे नाव - नाम

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - नाम

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) नाम व नामाची उजळणी

1. नाम म्हणजे काय?

प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तुंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात नाम म्हणतात.
सृष्टीला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय.
□ नाम हा विकारी शब्द आहे.
□ नाम हे विकारी शब्दांची जात आहे.
□ जे आपन डोळ्याने बघू शकतो. किंवा अनुभवू शकतो.
□ उदाहरणार्थ -: देव, झाड, पुस्तक, साखर, नदी .......

2. वाक्यात नाम ओळखण्याचे नियम

□ 1.वाक्याचा कर्ताकर्म नाम असते.
उदा. पारध्याने ससा पकडला.
□ 2.शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द हा नाम असतो.
उदा. पक्षी झाडावर बसला.
□ 3.विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द हा नाम असतो.
उदा. सागराने प्रतिसाद दिला.

3. नामाचे मुख्य तीन प्रकार

■ नामाचे मुख्य प्रकार तीन आहेत
1. सामान्यनाम
2. विशेषनाम
3. भाववाचक नाम

सामान्यनाम हे जातीवाचक नाम असते.
उदा. नदी,माणूस,कृत्रा,झाड,मुलगा.....
विशेषनाम हे व्यक्तीवाचक नाम असते.
उदा. गंगा,राम,मोती,आंबा.....
भाववाचक नाम हे गुण,स्थिती,कृति दर्शविणारे नाम असते.
उदा. सौंदर्य, गरिबी, चोरी .....

■ नामाचे मुख्य प्रकार ओळखण्याची Trick
1. जातीवाचक नाम - सामान्यनाम
2. व्यक्तीवाचक नाम - विशेषनाम
3. भाववाचक नाम - आई, ई, की, गिरी, ता, त्त्व, पण, पणा, य (र्य, ल्य), वा - हे प्रत्यय लावून असणारे नाम.
(Trick : यपणकी तावा त्व आई गीरी)

(B) नामाचे मुख्य तीन प्रकार व उजळणी

1. सामान्यनाम

एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्यास सामान्यनाम असे म्हणतात.
□ उदा. शाळा, साखर .......

■ सामान्यनामाचे दोन उपप्रकार
1. समूहवाचक नाम
2. पदार्थवाचक नाम

पदार्थवाचक नाम : जे घटक शक्‍यतो लिटर, मीटर किंवा कि. ग्रॅम मध्ये मोजले जातात किंवा संख्येत मोजले जात नाहीत. त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नामे म्हणतात.
□ उदा. तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, पाणी, सोने .....

समूहवाचक नाम : समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात.
उदा. मोळी, जुडी, ढिगारा, गंज .....

■ समूहदर्शक शब्द 
□ विमानांचा - ताफा ........ मडक्यांची - उतरंड 
□ काजूंची, माशांची - गाथण ... वेलींचा - कुंज 
□ गवताचा - भारा ........ फुलझाडांचा - ताटवा 
□ ताऱ्यांचा - पुंजका ........... तारकांचा - पुंज 
□ हत्तींचा - कळप ............ मेंढ्यांचा - कळप
□ हरणांचा - कळप ............. गुरांचा - कळप
□ दूर्वांची - जुडी .................. साधूंचा - जथा 
□ विटांचा, कलिंगडांचा - ढीग .. माणसांचा - जमाव 
□ केळ्यांचा - लोंगर, घड ... द्राक्षांचा - घड, घोस 
□ केसांचा - झुबका ............. फळांचा - घोस 
□ धान्याची - रास ............ प्रवाशांची - झुंबड 
□ विद्यार्थांचा - गट ......... . मुलांचा - घोळका 
□ नोटांचे - पुडके ... पालेभाजीची - गड्डी, जुडी 
□ महिलांचे - मंडळ .............. मुंग्यांची - रांग 
□ सैनिकांचे / ची - पथक, तुकडी,पलटण 
□ पुस्तकांचा, वह्यांचा - गट्ठा ... गवताची - गंजी, पेंढी 
□ नाण्यांची - चळत ...... केसांची - बट, जटा 
□ पोत्यांची, नोटांची - थप्पी ... वाद्यांचा - वृंद 
□ किल्ल्यांचा - जुडगा ........ फुलांचा - गुच्छ
□ पिकत घातलेल्या आंब्यांची - अढी   
□ करवंदाची - जाळी ... आंब्यांच्या झाडांची - राई 
□ खेळाडूंचा - संघ .......... यात्रेकरूंची - जत्रा 
□ पक्ष्यांचा - थवा ........... बांबूचे - बेट 
□ लाकडांची, उसांची - मोळी ... उतारूंची - झुंबड 
□ गाईगुरांचे - खिल्लार ... जहाजांचा - काफिला
□ प्रश्‍नपत्रिकांचा - संच ... पाठ्यपुस्तकांचा - संच
□ भाकऱ्यांची, रुपयांची - चवड ... वस्तूंचा - संच  
□ उंटांचा, लमाणांचा - तांडा

2. विशेषनाम

■ ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्यास विशेषनाम असे म्हणतात.
□ विशेषनाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते.
उदा. गोदावरी, सूर्य, राम, आशा, हिमालय .......

3. भाववाचक नाम

गुण, दोष, धर्म इत्यादींचा बोध होतो. त्यास भाववाचकनाम असे म्हणतात
□ भाववाचक नाम (धर्मवाचक नाम) - ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला 'भाववाचक नाम' किंवा 'धर्मवाचक नाम' असे म्हणतात.
उदा. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, गुलामगिरी, आनंद ......
गुण,स्थिती,क्रिया दाखविणाऱ्या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.
□ भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते. मात्र कल्पनेने ते आहे असे मानून त्याला नाव दिले जाते.
□ भाववाचक नामे वस्तुस्वरूपात दाखविता येत नाहीत

(C) नामाचे विविध कार्य व वचन विषयी

1. मुख्य तीन प्रकारांचे विविध कार्य

■ सामान्यनामाचा विशेषनाम म्हणून उपयोग
सामान्यनामे कधी कधी विशेषनामांचे कार्य करतात.
□  एखाद्या सामान्यनामाचा एखादी विशिष्ट व्यक्‍ती, स्थळ किंवा वस्तू तसेच प्राणी यांचे संबोधन करण्यासाठी उपयोग केल्यास, ते विशेषनाम होते. 
१) हिराने सर्व कामे पूर्ण केली.  
२) ती आत्ताच नगरहून आली. 
३) आमचा पोपट कालच गावाला गेला. 
□ वरील वाक्यात हिरा, नगर, पोपट ही मूळची सामान्य नामे आहेत. पण, वाक्यात त्यांचा उपयोग विशेषनाम म्हणून केले आहे.

■ विशेषनामाचा सामान्यनाम म्हणून उपयोग 
विशेषनामे कधी कधी सामान्यनामांचे कार्य करतात.
□ एखाद्या विशेषनामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी तसेच विशेषनामाचे कधीही अनेकवचन होत नाही पण, त्याचे अनेकवचन केल्यास ते सामान्यनाम होते. 
१) आमच्या वर्गात तीन पाटील आहेत. 
२) आमची बायको म्हणजे लक्ष्मीच
३) माझ्या ताईने सोळा सोमवारांचे व्रत केले.
□ वरील वाक्यात पाटील, लक्ष्मी, सोमवार हे मूळचे विशेषनाम आहेत. पण, वाक्यात त्यांचा उपयोग सामान्यनाम म्हणून केले आहे.

■ भाववाचक नामांचे विशेषनाम म्हणून उपयोग  
भाववाचक नामे ही कधी कधी विशेषनामाचे कार्य करतात.
□ भाववाचक नामांचा उपयोग व्यक्‍तीसाठी केल्यास ती विशेषनामे होतात. 
१) विश्‍वास परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. 
२) शांती ही माझी खास मैत्रीण आहे. 
३) नम्रता छान स्वयंपाक बनवते.
□ वरील वाक्‍यामधील विश्‍वास, शांती, नम्रता ही मूळची भाववाचक नामे आहेत. पण, वाक्यात त्यांचा वापर विशेषनाम म्हणून केले आहे. 

सामान्यनामे व विशेषनामे यांना "आई, ई, की, गिरी, ता, त्त्व, पण, पणा, य, वा" या सारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करता येतात.
शब्द - प्रत्यय - भाववाचक नाम
नवल - आई - नवलाई
श्रीमंत - - श्रीमंती
पाटील - की - पाटीलकी
गुलाम - गिरी - गुलामगिरी
शांत - ता - शांतता
मनुष्य - त्व - मनुष्यत्व
शहाणा - पण, पणा - शहाणपण, शहाणपणा
सुंदर - - सौंदर्य
गोड - वा - गोडवा
थोर - वी - थोरवी

■ भाववाचक नाम ओळखण्याची Trick
□ ज्या नामाला खालीलपैकी प्रत्यय लावलेले असतात, तो शब्द भाववाचक नाम असेल.
( आई, ई, की, गिरी, ता, त्त्व, पण, पणा, य, वा ) हे प्रत्यय लक्षात ठेवा.
(Trick : यपणकी तावा त्व आई गीरी)

■ अक्षरांचा नामांसारखा वापर
□ कधी कधी वाक्यामध्ये " एक अक्षर " ही नामाप्रमाणे वापरण्यात येते.
□ उदाहरणार्थ 
१) तिला " " ची बाधा झाली होती. 
२) श्री, च्या मागे " " येतोच. 

2. मुख्य तीन प्रकारच्या वचन विषयी

विशेषनामे भाववाचक नामे ही एकवचनी असतात.
□ विशेषनामे व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही.
उदा. सूर्य - सूर्य , सौंदर्य - सौंदर्य....
□ फक्त सामान्यनामाचेच अनेकवचन होते.
उदा. नदी - नद्या
विशेषनामभाववाचक नाम यांना अनेकवचनी केल्यास ते सामान्यनाम बनते.

(D) सिद्ध व साधित नामे (नामासारखा उपयोग)

1. सिद्ध व साधित नाम म्हणजे काय?

■ सिद्ध नाम
जी नामे मूळची असतात. म्हणजेच दुसऱ्या कोणत्याही शब्दापासून तयार झालेली नसतात, त्यांना " सिद्ध नाम " म्हणतात. 
□ सिद्ध नामाचे धर्मिवाचकधर्मवाचक नाम असे दोन प्रकार पडतात. 
□ धर्मिवाचक नाम (2) - सामान्यनामविशेषनाम
□ धर्मवाचक नाम (1) - भाववाचक नाम

■ साधित नाम 
जी नामे मूळची नसतात. म्हणजेच इतर शब्दांपासून बनलेली असतात. अशा नामांना " साधित नामे " असे म्हणतात. 
साधित नाम कोणत्या शब्दापासून बनतात यावरून, त्याचे तीन प्रकार पडतात. 
१) विशेषणसाधित नाम 
२) धातुसाधित नाम 
३) अव्ययसाधित नाम

2. विशेषणसाधित नाम

विशेषणला प्रत्यय लावून तयार झालेल्या नामांना विशेषणसाधित नाम असे म्हणतात.
□ कधा कधी विशेषण नामाचे कार्य करतात.
□ उदाहरणार्थ
१) (विशेषण) - शहाण्या माणसाला शब्दांचा मार.
......(नाम) - शहाण्याला शब्दाचा मार.
२) (विशेषण) - श्रीमंत माणसांना गर्व असतो.
......(नाम) - श्रीमंतांना गर्व असतो.

3. धातुसाधित नाम

धातूला प्रत्यय जोडून त्याचा कर्ता किंवा कर्म म्हणून नामासारखा उपयोग केल्यास त्याला धातुसाधित नाम असे म्हणतात.
धातूंना प्रत्यय लावून तयार झालेल्या नामांना धातुसाधित नाम असे म्हणतात.
धातूपासून तयार झालेल्या नामाला धातुसाधित नाम म्हणतात.
□ कधा कधी धातू नामाचे कार्य करतात.
□ उदाहरणार्थ
१) गुरुजीचे वागणे प्रेमळ असते. ('वाग' हा धातू)
२) घोड्याचे धावणे जोरात असते. (“धाव” हा धातू)
३) तिचे हास्य मधूर आहे. ('हस” हा धातू)

4. अव्ययसाधित नाम

अव्ययांचा वापर नामासारखा करणे म्हणजे अव्ययसाधित नाम होय.
□ कधा कधी अव्यय नामाचे कार्य करतात.
□ उदाहरणार्थ
१) आमच्या खेळाडूंची वाहवा! झाली.
२) त्याच्या बोलण्यात परंतु फार येतो.
३) हरी नापास झाल्यामुळे त्याची छी थू झाली.
वाहवा, परंतु, छी-थू ही मूळची अव्यये, पण वरील वाक्यांत ती' नामाचे कार्य करतात.

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव