प्रकरणचे नाव - क्रियापद

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - क्रियापद

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) क्रियापद व क्रियापदाचा धातू यांची व्याख्या

1. क्रियापद म्हणजे काय?

■ वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद.
○ क्रिया सांगणारा शब्द म्हणजे क्रियापद.
○ संस्कृत मध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात.
○ वाक्यातील क्रिया दाखविणारा व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. 
□ उदाहरणार्थ
१) गाय दूध देते
२) अजय पत्र लिहितो
○ वरील वाक्यात  देते, लिहितो हे शब्द वाक्यातील क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात म्हणून त्यांना क्रियापद असे म्हणतात.

2. क्रियापदाचा धातू म्हणजे काय?

धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द.
○ धातू ही विकारी शब्दजाती आहे. 
○ क्रियापदातील प्रत्ययरहित मुळ शब्दास धातू म्हणतात.
□ उदाहरणार्थ
१) ती हसते. (धातू-हस)
२) आई रोज देवाला जाऊन येते. (धातू-जा,ये)
वरील वाक्यात क्रियापद हसते,येते आहेत. या क्रियापदाला ते हे प्रत्यय लावून क्रियापद पूर्ण बनलेले आहे.
○ पण क्रियापदातील प्रत्ययरहित मुळ शब्द म्हणजे धातू होय. म्हणून हसते,येणे या क्रियापदतील प्रत्ययरहित मुळ शब्द हस,ये आहेत. म्हणजे " हस, ये " हे क्रियापदाचा धातू आहे.

3. क्रियापदाचे आख्यात विकार व अर्थ

■ क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात असे म्हणतात.
○ कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष यानुसार विविध काळात क्रियापदाचे रूप बदलते. त्याचप्रमाणे क्रियापदाच्या अर्थानुसारसुद्धा क्रियापद बदलते. याला " आख्यात विकार" असे म्हणतात.
○ आख्यातांना (क्रियापदाला) प्रत्यय (ता, ला, ई, ईल, ऊ, वा) लागून काळअर्थाची जी रूपे तयार होतात त्यांना " आख्यात प्रत्यय " असे म्हणतात.
□ आख्यात विकार एकूण सात आहेत.
○ काळानुसार चार आहे.
○ अर्थानुसार तीन आहे.
काळ / अर्थ ... क्रियापदाचे रूप ... आख्याताचे नाव
1. वर्तमानकाळ .. पळतो ...... (प्रथमा) ता - आख्यात
2. भूतकाळ ....... पळाला .... ला - आख्यात
3. रीतीभूतकाळ.. पळे ......... - आख्यात
4. भविष्यकाळ... पळेल ...... ईल - आख्याता
1. आज्ञार्थ ......... पळू ........ - आख्यात
2. विध्यर्थ ......... पळावा ..... वा - आख्यात
3. संकेतार्थ ........ पळता ..... (द्वितीयता) ता - आख्यात

■ क्रियापदाचा अर्थ
□ क्रियापदाच्या स्वरूपावरून केवळ काळाचा बोध न होता आज्ञा, उपदेश, विनंती, कर्तव्य, इच्छा, संकेत इ. चा बोध होतो. तेव्हा त्याला व्याकरणामध्ये " क्रियापदाचा अर्थ " असे संबोधतात. 
□ या अर्थाचे चार प्रकार पडतात. 
१) स्वार्थ २) आज्ञार्थ 
३) विध्यर्थ ४) संकेतार्थ

(1) स्वार्थी क्रियापद
□ जेव्हा क्रियापदावरुन केवळ काळाचा बोध होतो, इतर कोणत्याही अर्थाचा नाही, तेव्हा त्याला " स्वार्थी क्रियापद " असे म्हणतात. 
□ क्रियापदाची सर्व काळातील रूपे ही स्वार्थी असतात. 
□ स्वार्थ - वाक्याचा स्वत:चा किंवा मूळचा अर्थ
□ उदाहरणार्थ 
१) तो मुलगा खेळत आहे
२) मी चहा केला
३) राधाने वृत्तपत्र वाचले.

(2) आज्ञार्थी क्रियापद
□ क्रियापदाच्या स्वरूपावरून जेव्हा आशीर्वाद देणे, प्रार्थना, विनंती, उपदेश किंवा आज्ञा करणे या गोष्टींचा बोध होतो. तेव्हा त्यास " आज्ञार्थी क्रियापद " असे म्हणतात.
□ उदाहरणार्थ 
१) एवढे आमचे काम कराच. (विनंती
२) देवा, सर्वांना सुखी ठेव. (प्रार्थना
३) मुलांनो, सर्वजण रांगेत उभे रहा. (आज्ञा)

(3) विध्यर्थी क्रियापद
□ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या स्वरूपावरून " विधी "  म्हणजे कर्तव्य, शक्‍यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो, तेव्हा त्याला " विध्यर्थी क्रियापद " असे म्हणतात. 
□ विध्यर्थी वाक्यात शक्‍यतो, क्रियापदाला वा, वी, वे ही प्रत्यय जोडलेली असतात.
□ उदाहरणार्थ  
१) तो बहुधा घरी असावा. (शक्‍यता)  
२) आज पाऊस थांबावा. (इच्छा)  
३) कृपया, उत्तर पाठवावे. (विनंती)  
४) अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे. (योग्यता)  
५) मुलांनी आई-वडिलांची आज्ञा पाळावी. (कर्तव्य

(4) संकेतार्थी क्रियापद
□ जेव्हा वाक्‍यातून संकेत किंवा अट स्पष्ट होते, तेव्हा त्यास " संकेतार्थ क्रियापद " असे म्हणतात. 
□ संकेतार्थ दर्शविणारी वाक्ये जर-तर, जरी-तरी, म्हणजे, की या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.
□ उदाहरणार्थ 
१) पाऊस आला, तरी सहल जाणारच. 
२) जर तू आलास, तर मी पैसे देईन. 
३) पहिला नंबर आला, की पेढे वाटीन.

■ करणरूप व अकरणरुप क्रियापदे 
(1) करणरूप क्रियापद 
□ जेव्हा वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान हे होकारार्थी असते, तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदाला " करणरूप क्रियापद " असे म्हणतात. 
(2) अकरणरूप क्रियापद 
□ जेव्हा वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान हे नकारार्थी असते, तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदाला " अकरणरूप क्रियापद " असे म्हणतात.
☆ करणरूप क्रियापद - होकारार्थी 
☆ अकरणरूप क्रियापद - नकारार्थी

(B) क्रियापदाचे वर्गीकरण व उजळणी

1. मुख्य क्रियापद म्हणजे काय?

■ धातूला प्रत्यय जोडून तयार केलेला शब्द पूर्ण क्रिया दर्शवीत असेल, तर त्याला मुख्य क्रियापद म्हणतात.
○ नोट - वाक्यात एकच क्रियापद असेल.
□ उदाहरण
1) गाय दूध देते. (एकच क्रियापद )
( देते - मुख्य क्रियापद )
○ नोट - वाक्यात दोन क्रियापद असेल पण, एकाच क्रियेचा बोध होत नसेल / दोन वेगळ्या क्रियेचा बोध होत असेल तर,
□ उदाहरण
1) बाळ, एवढा लाडू खाऊन जा. (दोन क्रियापद )
( जा - मुख्य क्रियापद )

2. धातूसाधीत क्रियापद / कृदन्ते म्हणजे काय?

■ धातूंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या  शब्दास धातुसाधित / कृदन्त म्हणतात.
○ वाक्याचा  अर्थ पूर्ण न करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे धातुसाधित / कृदन्त होय. 
□ उदाहरणार्थ
१) तो विद्यार्थी नेहमी मार खात.
२) तो विद्यार्थी आता मार खात नाहीत
○ वरील पहिल्या वाक्यात खात वाक्याचा अर्थ पूर्ण करते म्हणून ते मुख्य क्रियापद आहे.
○ वरील दुसऱ्या वाक्यात खात हे वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही म्हणून ते धातुसाधित / कृदन्त आहे. 
□ धातुसाधिते वाक्यात नाम, विशेषण, क्रियाविशेषण म्हणून कार्य करतात. . 
धातू - धातुसाधित / कृदन्त  
हस - हसणारा / हसून / हसताना 
बस - बसणारा / बसून / बसताना

धातूला प्रत्यय लागून धातुसाधित / कृदन्ताचे विविध रूपे बनतात.
○ धातुसाधित प्रत्यय - णे, त, ता, ताना, ऊ, ऊन, ला, वे इत्यादी. वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नाहीत.
□ उदाहरणार्थ
○1. णे-कृदन्त - त्याचे वागणे मला आवडते.
○2. -कृदन्त - तो रस्त्याने खात जातो. 
○3. ता-कृदन्त - तो घरी चालता झाला. 
○4. ताना-कृदन्त - तो धावताना रस्त्यात पडला. 
○5. -कृदन्त - मुलांना खाऊ आवडतो. 
○6. ऊन-कृदन्त - खुर्चीत बसून तो बोलला. 
○7. ला-कृदन्त - झाकली मूठ सव्वालाखाची. 
○8. वे-कृदन्त - त्याचे चेंडू फसवे असतात. 
● ट्रिक : ऊ ऊनताना लाता वेतणे (ऊ, ऊन, ताना, ला, ता, वे, त, णे)

3. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय?

■ धातुसाधिताला मदत करावयास येणाऱ्या क्रियापदाला सहाय्यकारी क्रियापद  म्हणतात.
○जेव्हा अपूर्ण क्रिया पूर्ण दर्शवीण्यासाठी धातुसाधिताला मदत करणाऱ्या क्रियापदाला सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. 
□ उदाहरणार्थ
१) क्रीडांगणावर मुले खेळू लागली. (खेळू लागली-पूर्ण क्रिया)      
○ वाक्यातील खेळू हा शब्द खेळण्याची क्रिया दाखवितो, पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नाही.  
○ वाक्यातील खेळू लागली या दोन शब्दांनी ती क्रिया पूर्ण होते. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने धातुसाधिताची क्रिया पूर्ण होते.
○ वाक्यातील खेळू हा धातुसाधित क्रियापद आहे.
○ वाक्यातील लागली हा सहाय्यकारी क्रियापद आहे.

■ खालील धातूपासून सहायक क्रियापद बनत असते.
अस, नस, हो, नको, नये, नव्हे, नलगे, हवे, पाहिजे, ये, दे, जा, कर, लाग, शक, टाक इत्यादी.
○ सहायक क्रियापदाच्या धातूतून काळाचा / अर्थाचा बोध होत असतो.

4. संयुक्त क्रियापद म्हणजे काय?

धातुसाधित सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद तयार होते.
संयुक्त क्रियापद म्हणजे = धातुसाधित + सहाय्यक क्रियापद
○ धातुसाधित व सहायक क्रियापद यांच्या संयोगाने बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात.
□ उदाहरणार्थ
१) क्रीडांगणावर मुले खेळू लागली
(खेळू हे धातुसाधित तर लागली हे सहायक)
२) बाळ दोन घास जेवून घे
(जेवून हे धातुसाधित तर घे हे सहायक)
○ वरील वाक्यात खेळू,जेवून धातुसाधित आहे. 
○ वरील वाक्यात  खेळू लागली,जेवून घे संयुक्त क्रियापद आहे.

■ लक्षात ठेवा "अभ्यास करणे, प्रेम करणे, पाणी घालणे, विचार करणे" अशा नामक्रियापद मिळून होणाऱ्या शब्दांना संयुक्त क्रियापद मानू नये. अशा ठिकाणी  "करणे, मारणे" ही मुख्य क्रियापदे मानून "अभ्यास, प्रेम, पाणी, विचार" ही त्यांची कर्मे मानावीत.
○ संयुक्त क्रियापद होण्यासाठी दोन्हीही शब्दातून एकच क्रिया दर्शवणे आवश्यक आहे. दोन्ही शब्दांतून वेगवेगळ्या क्रिया दर्शवल्यास ते संयुक्त  क्रियापद नसते.
□ उदाहरणार्थ
१) बाळ, एवढा लाडू खाऊन टाक
२) बाळ, एवढा लाडू खाऊन जा
○ पहिल्या वाक्यात खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे. इथे टाक हे सहायक क्रियापद आहे. तर खाऊन हे धातुसाधित आहे. 
○ इथे खाण्याची क्रिया व टाकण्याची क्रिया अशा दोन क्रिया नसून खाऊन टाक याचा अर्थ खा, यातील दोन शब्दांनी एकाच क्रियेचा बोध होतो. 
○ दुसऱ्या वाक्यातील खाऊन जा या शब्दांत खाण्याची व नंतर जाण्याची अशा दोन वेगळ्या क्रिया आहेत. म्हणून खाऊन जा हे संयुक्त क्रियापद नाही. जा हे मुख्य क्रियापद असून खाऊन हे धातुसाधित आहे. 

trick-1. दोन शब्दांनी एकाच क्रियेचा बोध होतो. संयुक्त क्रियापद आहे
        उदा.    "खाऊन टाक"
trick-2. ज्या वाक्यात साहाय्यक क्रियापद, तो वाक्य संयुक्त क्रियापदाचा आहे.
      उदा.    "खाऊन टाक"
trick-3.दोन वेगळ्या क्रियेचा बोध होतो. संयुक्त क्रियापद नाही.
                उदा.     " खाऊन जा"
trick-4.नामक्रियापद मिळून होणाऱ्या क्रियेचा बोध.संयुक्त क्रियापद नाही.
                उदा. "पाणी घालणे"

☆ trick : वरील क्रियापद आधारित

□ क्रियापद : वाक्याचा अर्थ पूर्ण दर्शविते
□ धातुसाधित : क्रिया अपूर्ण दर्शविते.
□ सहायक क्रियापद : वाक्याचा अर्थ पूर्ण करते. 
□ संयुक्त क्रियापद : धातुसाधित + सहायक क्रियापद

(C) क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार

1. सकर्मक क्रियापद

■ ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते. त्यास सकर्मक क्रियापद म्हणतात.
○ कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबत असेल  तर ते सकर्मक क्रियापद असते.
○ ज्या वाक्यात कर्ताकर्म दोन्ही असते ते सकर्मक क्रियापद.

■ उदाहरणार्थ
१) गवळी धार काढते.  (कर्ता-काढणारी कोण= गवळी )
(कर्म-काढलेली काय?= धार )
२) अनुराग निबंध लिहितो.
(कर्ता-लिहणारा कोण= अनुराग )
(कर्म-लिहलेला काय?= निबंध )
○ वरील वाक्यात कर्ता व कर्म दोन्ही आहे. हे वाक्य सकर्मक  क्रियापदाचे आहे.

trick क्रियापदाला कर्ताकर्म दोन्ही असणे. म्हणजे सकर्मक क्रियापद.

2. अकर्मक क्रियापद

■ कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल  तर ते अकर्मक क्रियापद असते.
○ अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते..
○ ज्या वाक्यात कर्ता व कर्म एकच असते ते अकर्मक क्रियापद. या वाक्यात कर्म नसते. म्हणजे कर्म हे कर्ता असते.

■ उदाहरणार्थ
१) मी रस्त्यात पडलो. (कर्ता-पडणारा कोण?= मी )
(कर्म-पडलेले काय?= मी )
२) आज भाऊबीज आहे.
(कर्ता-असणारा कोण?= भाऊबीज )
(कर्म-असलेले काय?= भाऊबीज )
○ वरील वाक्यात कर्ता व कर्म दोन्ही एकच आहे . हे वाक्य अकर्मक  क्रियापदाचे आहे.म्हणजे सर्व वाक्यात फक्त कर्ता आहे. यात कर्म दिसत असेल पण कर्म नसते. कर्म हे कर्ताच आहे.

trick- क्रियापदाला कर्ता असणे, कर्म नसणे. म्हणजे अकर्मक क्रियापद‌.

■ येथे गोंधळू नका
□ वेगवेगळ्या धातूंमध्ये स्थितीवाचकगतिवाचक धातू हे अकर्मक असतात. कृतीवाचक धातू हे सकर्मक असतात. 
अकर्मक धातू - सळसळ, खळखळ, ऊठ, बस, नीज, झोप, थरथर, कुडकूड, लाज, घाबर, भी, हस, अस, नस, नहो, हो, निपज, उमल.

☆ trick : वरील क्रियापद आधारित

□ सकर्मक क्रियापद : ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते. (वाक्यात कर्ताकर्म दोन्ही असतात.)
□ अकर्मक क्रियापद : ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज नसते. (कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबते.)

(D) क्रियापदाच्या अर्थावरील प्रकार

1. उभयविध क्रियापद

■ जे क्रियापद सकर्मकअकर्मक अशा दोन्ही पद्धतींनी वापरले जाते, त्याला उभयविध क्रियापद म्हणतात.
१) त्याने घराचे दार उघडले. (सकर्मक क्रियापद)
२) त्याच्या घराचे दार उघडले.(अकर्मक क्रियापद)

■ उदाहरणार्थ
१) रामाने धनुष्य मोडले. (कर्ता-राम,कर्म-धनुष्य)
२) ते लाकडी धनुष्य मोडले. (कर्ता-धनुष्य,कर्म-धनुष्य)
○ वरील वाक्यांत मोडले हे क्रियापद आहे. 
पहिल्या वाक्यात "मोडले" हे क्रियापद सकर्मक आहे, तर दुसऱ्या वाक्यात ते अकर्मक आहे. 
○ यावरून असे दिसते की, एकच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यात सकर्मकअकर्मक असे दोन्ही तऱ्हांनी वापरता येते; अशा क्रियापदांना उभयविध क्रियापद असे म्हणतात. 

कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे, उघडले, मोडणे, आठवणे या क्रियापदाचा प्रकार उभयविध क्रियापद
trick- क्रियापद शेवटी णे,ले प्रत्यय व ऐ-कारांत क्रियापद असते.
○ उभयविध क्रियापद धातु - काप, आठव, स्मर, लोट, मोड, मिट, आठव

2. भावकर्तृक क्रियापद / अकर्तृक क्रियापद

■ ज्या वाक्यात कर्ता कोणता आहे हे निश्‍चित सांगता येत नाही, तर क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हाच वाक्याचा कर्ता असतो. अशा क्रियापदांना " भावकर्तृक क्रियापदे " असे म्हणतात.
□ भावकर्तृक क्रियापदांना स्वतंत्र, स्पष्टकर्ता नेसतो.
○ या क्रियापदांचा कर्ता वाक्यात स्पष्ट नसतो म्हणून या क्रियापदाला  अकर्तृक क्रियापद असे म्हणतात.
○ क्रियापदात कर्ता दिसत नाही, तर तो क्रियापदातच लपलेला असतो.
□ वाक्यात क्रिया करणारा कर्ता असावाच लागतो; परंतु काही वाक्यात तो क्रियापदातच सामावलेला असतो; म्हणून अशा क्रियापदांना भावकर्तृक क्रियापद असे म्हणतात. 

■ उदाहरणार्थ
१) गावी जाताना वडगावजवळ उजाडले. (उजेड झाला) 
२) आज दिवसभर सारखे गडगडले. (गडगड झाला) 
३) मी घरी पोहोचण्यापूर्वीच अंधारले. (अंधार झाला)

उजाडले, मावळले, सांजावले, अंधारले, कोसळले, गडगडले, मळमळले या क्रियापदाचा प्रकार भावकर्तृक / अकर्तृक क्रियापद.
trick- क्रियापद शेवटी ले प्रत्यय व ऐ-कारांत क्रियापद असते.

3. द्विकर्मक क्रियापद

■ ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते अशा क्रियापदास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात.
□ जेव्हा वाक्यात दोन कर्मे असतात तेव्हा एक कर्म प्रत्यक्ष, तर दुसरे कर्म अप्रत्यक्ष असते तेव्हा त्याला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात.
वस्तुवाचक कर्मांना प्रत्यक्ष कर्म म्हणतात.
○ वस्तुवाचक कर्म हे नेहेमी "प्रत्यक्ष" कर्म असते.
व्यक्तिवाचक कर्मांना अप्रत्यक्ष कर्म म्हणतात.
○ व्यक्तिवाचक कर्म हे नेहेमी "अप्रत्यक्ष" कर्म असते.

■ उदाहरणार्थ
१) द्रोणाचार्य अर्जुनाला धनुर्विद्या शिकवतात. 
 (शिकवलेले............. काय? - धनुर्विद्या (प्रत्यक्ष कर्म)    
 (शिकवतात......... कोणाला? - अर्जुनाला (अप्रत्यक्ष कर्म)
  २) मुलीने राजाला पिशवी दिली. 
  ३) आजीने नातीला गोष्ट सांगितली.
प्रत्यक्ष कर्माला विभक्ती प्रत्येय नसते. (प्रथमा) असते.
अप्रत्यक्ष कर्माला विभक्ती प्रत्येय असते. (चतुर्थी) असते.

trick -:
१. क्रियापदाला काय? म्हणून प्रश्न करणे.
(कर्म / प्रत्यक्ष कर्म) - प्रथमा विभक्ती
२. क्रियापदाला कोणाला? म्हणून प्रश्न करणे.
(अप्रत्यक्ष कर्म) - चतुर्थी विभक्ती प्रत्येय

☆ trick : वरील क्रियापद आधारित

(E) क्रियापदाच्या रूपावरील प्रकार

1. प्रयोजक क्रियापद

■ वाक्यात क्रियापदाने दाखविलेली क्रिया कर्त्याला करणे शक्‍य नसते ती क्रिया दुसऱ्या कोणीतरी घडवून आणलेली असते, त्यास प्रयोजक क्रियापद म्हणतात. 
□ मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून,  दुसऱ्याकडून करवून घेतो अशा अर्थाच्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद म्हणतात.
कर्त्याला क्रिया करणे शक्‍य नसते हे या क्रियापदाचे वैशिष्ट्य आहे.
○ प्रयोजक क्रियापदात कर्ता दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो. 
○ प्रयोजक क्रियापदात कर्ता स्वत: क्रिया करत नाही.
प्रयोजक म्हणजे प्रेरणा देणारा

■ उदाहरणार्थ
१. सचिनने पक्ष्यांना झाडावरून उडविले
२. मदारी माकडाला नाचवितो
३. आई मुलाला हसविते
४. गुरुजी मुलांना शिकवितात.

trick- क्रियापदास शेवटी वितो, विते, विणे, विली, वितात हे प्रत्यय लागलेले असते.

2. शक्य क्रियापद

■ जेव्हा क्रियापदाचा धातू कर्त्याला क्रिया करण्याची शक्‍यता (सामर्थ्य) आहे, असे दाखवितात त्यास शक्‍य क्रियापद म्हणतात. 
कर्त्याला क्रिया करणे शक्‍य असते हे या क्रियापदाचे वैशिष्ट्य आहे.

■ उदाहरणार्थ
१. मला आता काम करवते
२. वळूला चांगलेच पळवते.
३. त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते
४. राणीला आंबट दही खाववते
○ या क्रियापदामध्ये वते प्रत्यय लावलेले असते. 
□ काही वेळा शक्‍य क्रियापदे नकारार्थी असतात. 
१. शैलाकाकूंना साधा जिनाही चढवत नाही. 
२. मला आता अभ्यास करवत नाही. 

trick- क्रियापदास शेवटी वत, वतो, वते हे प्रत्यय लागलेले असते.

अपवाद : क्रियापदास शेवटी वत, वतो, वते हे प्रत्यय प्रयोजकशक्य क्रियापद दोन्हीत लागलेले असते.
अशा वेळी खालील लक्षणांवरून उत्तर ठरवावे.
शक्य क्रियापद - कर्त्याला क्रिया करणे शक्य असते.
प्रयोजक क्रियापद - कर्ता या क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो.
■ उदाहरणार्थ
शक्य - मला एवढा डोंगर चढवतो.
प्रयोजक - तो मला डोंगरावर चढवतो.
शक्य - मला आता खेळवते.
प्रयोजक - आई मुलाला खेळवते.
शक्य - त्या मुलाला आता एक किलोमीटर चालवते.
प्रयोजक - आई मुलाला चालवते. 

3. अनियमित / गौण क्रियापद

■ ज्या क्रियापदामधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही, अशा क्रियापदांना अनियमित क्रियापद किंवा गौण क्रियापद म्हणतात. 
□ अनियमित धातुंना आख्यातांचे प्रत्यय लागत नाहीत.
○ उदा - आहे, नाही, नव्हे, पाहिजे, नको, नलगे, नये या क्रियापदांची रूपे अशा प्रकारची आहेत. त्यांची मूळ रूपे क्रियापदेच असून त्यांत अमुक एक धातू आहे, असे निश्चितपणे सांगता येत नाही.

■ उदाहरणार्थ
१) मुलांनी सतत खेळू नये
२) सुज्ञास अधिक सांगणे नलगे   
३) या दरवाजाने जाऊ नको
४) परमेश्वर सर्वत्र आहे
५) मला कॉफी पाहिजे
६) असे वागणे बरे नव्हे
७) आई घरी नाही

■ trick - आहे, नाही, नव्हे, पाहिजे, नको, नलगे, नये या क्रियापदाचा प्रकार अनियमित / गौण क्रियापद.
○ या क्रियापदामधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही.

☆ trick : वरील क्रियापद आधारित

□ शक्य क्रियापद : कर्त्याला क्रिया करणे शक्य असते.
□ प्रयोजक क्रियापद : कर्ता या क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो.
□ अनियमित / गौण क्रियापदे : क्रियापदामधील धातू निश्‍चितपणे सांगता येत नाही. (आहे, पाहिजे, नाही, नको, नव्हे, नये, नलगे)

(F) सिध्द व साधित क्रियापद (क्रियापदासारखा उपयोग)

1. सिध्द क्रियापद

■ क्रियापदांतील मूळ धातूंना सिद्ध धातू म्हणतात. अशा धातूला प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदांना “ सिद्ध क्रियापदे ” म्हणतात.   
जा, ये, कर, उठ, बस, बोल, पी हे मूळचे धातू आहेत. त्यांना सिद्ध धातू म्हणतात. या सिद्ध धातूंना प्रत्यय लावून बनविलेल्या क्रियापदांना सिद्ध क्रियापद म्हणतात.  
जा, ये, कर, ऊठ, बस, बोल, पी या मूळच्या धातूंना प्रत्यय लागून  बनविलेल्या क्रियापदांना सिद्ध क्रियापद म्हणतात.   
□ सिद्ध क्रियापद : मूळ धातूंना प्रत्यय लागून जी क्रियापदे तयार होतात, त्यांना सिद्ध क्रियापद असे म्हणतात.  

■ उदाहरणार्थ   
१) मी खेळायला जातो. (मूळ धातू - जा)    
२) गावात हत्ती येईल. (मूळ धातू - ये)    
३) मी उद्यापासून लवकर उठेन. (मूळ धातू - उठ)    
४) ती फळे खाईल. (मूळ धातू - खा)    
५) मी मतदान करेन. (मूळ धातू - कर)  
□ वरील वाक्यात जा - जातो, ये - येईल, उठ - उठेन, खा - खाईल या मूळच्या धातूंना प्रत्यय लागून बनविलेल्या या क्रियापदांना " सिद्ध क्रियापद " म्हणतात.  

2. साधित क्रियापद

नाम, विशेषण, क्रियापदअव्यय अशा विविध जातींच्या शब्दांपासून तयार होणाऱ्या धातूंना साधित धातू असे म्हणतात व अशा साधित धातूपासून बनलेल्या क्रियापदांना " साधित क्रियापदे " असे म्हणतात.
□ म्हणजे मुळात नाम, विशेषण, अव्यय असलेल्या शब्दांपासून क्रियापदे तयार होतात, त्यांना साधित क्रियापद म्हणतात.  
१) नामसाधित - पाणावले, हाताळले, डोकावले  
२) विशेषणसाधित - उंचावला, एकवटला, स्थिरावले  
३) अव्ययसाधित - पुढारले, खालावले  
४) धातुसाधित - मागितली, बसले  

■ उदाहरणार्थ  
१. गणेशची सर्व कामे सुरेश हाताळतो. (नाम साधित)  
२. वडिलांच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले. (नाम साधित)  
३. खान्देशवासीय सध्या सुरतमध्ये स्थिरावले. (विशेषण साधित)  
४. ग्रामीण जनता आता बरीच पुढारली. (अव्यय साधित)  
○ वरील वाक्यात पहिल्यादुसऱ्या वाक्यातील क्रियापदे हातपाणी या दोन नामांपासून बनलेली आहेत.   
तिसऱ्या वाक्यातील स्थिरावला हे क्रियापद स्थिर या विशेषणापासून बनविले आहे.    
चौथे वाक्यातील पुढारली हे क्रियापद पुढे या अव्ययापासून बनलेले आहे.   
○ अशा प्रकारे विविध धांतूपासून बनलेल्या क्रियापदांना " साधित क्रियापद " असे म्हणतात.  

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव